महाराष्ट्र दिन Maharashtra Din :
स्वातंत्र्यानंतर भाषावार प्रांत रचना करण्यासाठी मागणी होत होती. भाषावार प्रांत रचना असावी/नसावी याविषयी दोन गट निर्माण झाले होते. भाषावार प्रांत रचनेसाठी दक्षिणेत लढा पेटला आणि तेलगू भाषिकांसाठी वेगळ्या राज्याची मागणी करण्यात आली. इकडे महाराष्ट्रात मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची मागणी होऊ लागली. १ मे १९६० रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र अस्तित्वास आला. त्यामुळे १ मे रोजी महाराष्ट्र दिन साजरा करण्यात येतो.
संयुक्त महाराष्ट्र चळवळ
स्वातंत्रपूर्व काळात संयुक्त महाराष्ट्र परिषद स्थापन झाली, मात्र सर्वप्रथम देशप्रेम आणि स्वतंत्रता यासाठी सर्वानी लढा दिला. भारताच्या स्वातंत्र्यसाठी लढा उभारला गेला. स्वातंत्र्यानंतर २१ नोव्हेंबर १९५५ साली संयुक्त महाराष्ट्रासाठी पहिल्यांदा “मुंबई बंद” ची हाक देण्यात आली. “मुंबई बंद” ला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. भाषावार प्रांतरचनेची मागणी तग धरू लागली,अनेक लोक लढ्यात प्रत्यक्ष सहभाग नोंदवू लागले. आचार्य अत्रे, श्रीपाद डांगे, नाना पाटील, प्रभोधनकार ठाकरे, सेनापती बापट, एस एम जोशी या सर्वानी संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे नेतृत्व केले.
तत्कालीन मुख्यमंत्री मोरारजी देसाई संयुक्त महाराष्ट्रासाठी सकारात्मक नव्हते. तसेच मुंबईतील भांडवलदार देखील या विरोधात होते. पण काहीही झाले तरीही मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे या वर लोक ठाम होते. सातत्याने आंदोलन होत होती, मोर्चे निघत होते. अनेकदा आंदोलन चिरडण्यासाठी पोलिसांना लाठीमार, गोळीबाराचे आदेश देण्यात आले. मात्र लोक मागे हटले नाहीत.

द्विभाषिक राज्य
भाषावार प्रांत रचना करण्यासाठी नेहरू तयार नव्हते. याला बगल देण्यासाठी महाराष्ट्र आणि गुजरात मिळून द्विभाषिक राज्य आणि मुंबई ही सामायिक राजधानी असे घोषित करण्यात आले. परंतु मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे ही मागणी ठाम होती. संयुत महाराष्ट्र चळवळ अधिक बळकट होत होती. सर्व पक्ष संयुक्त महाराष्ट्रासाठी एकत्र आले आणि असंख्य लोकांनी मिळून विधान भवनावर मोर्चा काढला. आंदोलनाची तीव्रता वाढली, गोळीबाराचे आदेश निघाले. असंख्य आंदोलनकर्ते जखमी झाले, काहींना हौतात्म्य प्राप्त झाले. इतके सगळे होऊनही सरकार आणि लोक दोन्ही ठाम होते.
शेवटी लोकांच्या रोषाला पाहून मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची मागणी मान्य करण्यात आली आणि तसे घोषित करण्यात आले. अखेर तो दिवस आला , तो दिवस म्हणजे १ मे १९६०. संपूर्ण महाराष्ट्र व मुंबई मध्ये जल्लोष करण्यात आला. सर्वात हळ हळ होणारी बाब म्हणजे संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात एकूण १०६ हुतात्म्यांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले. महाराष्ट्र दिन साजरा करताना यांचे स्मरण केले पाहिजे.
संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील सर्व हुतात्म्यांना विनम्र अभिवादन.
१ मे महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा !!
आंतरराष्ट्रीय कामगार दिन
१ मे दिवशी कामगार दिन साजरा करण्यात येतो. अमेरिकेमध्ये कामगारांच्या न्याय हक्कांसाठी आंदोलन झाले. कडकडीत बंद पाळण्यात आला. शिकागो येथे झालेल्या आंदोलनाला चिरडण्यासाठी झालेल्या कारवाईत अनेक मजूर जखमी झाले काहींचे प्राण गेले. या सर्व कामगारांच्या स्मरणार्थ १ मे हा आंतरराष्ट्रीय कामगार दिन (May Day) म्हणून साजरा केला जातो. भारतात १ मे १९२३ रोजी कामगार दिन साजरा करण्यास सुरुवात झाली. आंतरराष्ट्रीय कामगार दिन, मजूर दिन, श्रमिक दिन असे अनेक वेगवेगळ्या नावाने संबोधले जाते.
सर्व कामगार बंधूना आंतरराष्ट्रीय कामगार दिनाच्या शुभेच्छा !!
संबंधित लेख