“मराठी भाषा गौरव दिन” विशेष लेख

शेअर करा

मराठी भाषा गौरव दिन माहिती

मराठी भाषा गौरव दिन हा २७ फेब्रुवारी या  दिवशी साजरा केला जातो. श्री. विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कवी कुसुमाग्रज यांच्या स्मृतींना अभिवादन देण्यासाठी मराठी भाषा गौरव दिन साजरा केला जातो. २७ फेब्रुवारी हा दिवस म्हणजे कवी कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस. मराठी भाषा ही ज्ञानभाषा व्हावी यासाठी कुसुमाग्रज यांनी विशेष प्रयत्न केले. 

२१ जानेवारी २०१३ रोजी महाराष्ट्र शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवशी म्हणजेच २७ फेब्रुवारी ला मराठी भाषा गौरव दिन साजरा केला जातो. मराठी भाषा आणि महाराष्ट्राची साहित्य संस्कृती यासाठी कुसुमाग्रज यांनी महत्वाचे योगदान दिले.

जागतिक मराठी राजभाषा दिन

१ मे हा दिवस जागतिक मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा केला जातो. महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर १९६४ च्या महाराष्ट्र राजभाषा अधिनियमानुसार मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा देण्यात आला. १ मे १९९७ पासून जागतिक मराठी राजभाषा दिन साजरा केला जातो.

जागतिक मातृभाषा दिन

युनेस्को या जागतिक पातळीवरील संस्थेने २१ फेब्रुवारी हा दिवस जागतिक मातृभाषा दिन म्हणून साजरे करण्याचे ठरवले. त्या प्रमाणे संपूर्ण जागर आपल्या मातृभाषेचे प्रेम व्यक्त करण्यासाठी जागतिक मातृभाषा दिन साजरा केला जातो.

जागतिक मराठी राजभाषा दिन, जागतिक मातृभाषा दिन आणि मराठी भाषा गौरव दिन हे तीन वेगवेगळे दिन विशेष आहेत. बऱ्याच लोकांकडून मराठी भाषा गौरव दिन हा जागतिक मराठी राजभाषा दिन म्हणून संबोधला जातो, तर तसे नसून २७ फेब्रुवारी हा मराठी भाषा गौरव दिन आहे.

तुम्हाला जर Essay In Marathi बद्दल अजून जाणून घायचे असेल तर Gyangenix वेबसाईटला नक्की भेट द्या .

महाराष्ट्र दिन Maharashtra Din

मराठी भाषा संवर्धन 

मराठी भाषा जपली पाहिजे मराठी भाषा टिकली पाहिजे म्हणजे नक्की काय ? फक्त मराठी बोलणे किंवा पोशाख घालणे म्हणजेच मराठी जपणे नाही. तर महाराष्ट्राला लाभलेला इतिहास, संत- साहित्य परंपरा, मराठी संस्कृती या गोष्टी जपल्या पाहिजेत आणि हाच वारसा पुढच्या पिढीकडे सोपवला पाहिजे. नुसता मराठीचा आव आणून काही होणार नाही तर भाषेला आत्मसात करणे गरजेचे आहे.

होय, महारष्ट्रात मराठीच बोलली पाहिजे आणि येत नसेल तर शिकली देखील पाहिजे. दुकानाच्या पाट्या मराठी भाषेत हव्यात.. परंतु ज्यावेळेस दुकानाच्या पाट्या सोबत दुकान मालक मराठी होईल तेव्हा मराठी अधिक समृद्ध झालेली असेल. मराठी बाणा हा केवळ तोडफोड करण्यात नाही तर महाराष्ट्रासाठी आणि मराठी साठी राजकारण सोडून मनापासून प्रयत्न करण्यात मराठी बाणा आहे.

वर्षातून एक दिवस भलेमोठे व्यासपीठ सजवून, मोठमोठे राजकीय नेते मंडळी एकत्र येतात, कार्यक्रमाला गर्दी जमते आणि मराठी भाषा गौरव दिन साजरा केला जातो. नक्कीच, हा कार्यक्रम झालाच पाहिजे. मात्र बाकीच्या दिवशी तुमचे मराठी प्रेम कुठे जाते? जर खरंच मराठी भाषेवर प्रेम आहे तर मराठी भाषेला अभिजात दर्जा कधी दिला जाणार? कधी होणार उत्कर्ष आपल्या माय मराठीचा?

भाषिक अभिमान  

जर आपण दाक्षिणात्य राज्यात गेला असाल तर तिथे फक्त एकच भाषा बोलली जाते जी त्या राज्याची राजभाषा असते. जर आपण परराज्यातून असाल तर ती भाषा अवगत केल्याशिवाय गत्यंतर नसते. हिंदी हि राष्ट्रभाषा नाही असे त्यांचे स्पष्ट मत आहे. भाषेचा स्वाभिमान कसा जपावा हे यांच्याकडून आपण शिकले पाहिजे. दाक्षिणात्य लोक भाषेबद्दल आणि प्रांताबद्दल अतिशय कडवट आहेत.

याउलट आपल्या महाराष्ट्र राज्यात मराठी साठी इतकी तत्परता दाखवली जात नाही. तर सर्रास हिंदी भाषेचा वापर केला जातो. खाजगी क्षेत्रातल्या कंपन्यांमध्ये दोन मराठी माणसे देखील एकमेकांशी हिंदी मध्ये संवाद करतात. का? मराठी बोलायची लाज वाटते? व्वा रे “सो कॉल्ड एज्युकेटेड पीपल”. मराठीत बोललात तर तुमचा पगार कमी होईल? असा चुकीचा पायंडा पडला तर घरात देखील हिंदीत बोलावं लागेल काही दिवसात. 

शालेय शिक्षण 

शालेय शिक्षणातही मराठी भाषा नाही. मराठी शाळा बंद होत चालल्या आहेत. इंग्रजी माध्यमाचा वाढता प्रभाव पाहता मराठी ज्ञानभाषा होणार असे म्हणता येणार नाही. शालेय शिक्षणात मराठीचा वापर वाढला तरच पुढची पिढी मराठी बोलू शकेल. अथवा मराठीचा विसर पडेल आणि ज्ञानभाषा तर सोडाच बोली भाषा देखील असणार नाही.  

मराठी भाषा गौरव दिन साजरा करत असताना आपल्या भाषेचा गौरव कसा होईल या साठी प्रयत्न केला पाहिजे. एका दिवसापुरते भाषण आणि टाळ्या आपल्या मराठी भाषेला काहीच देऊ शकत नाहीत. जर मराठी बोलली गेली नाही तर मराठी टिकणार नाही. जर मराठी बोलायची लाज वाटत असेल तर मराठी कधीच टिकणार नाही.


वरील लेखाबद्दल आपल्या प्रतिक्रिया खाली दिलेल्या संपर्क कक्षा मध्ये नोंदवू शकता.

संबंधित लेख

Comments are closed.

error: Content is protected !!